वर्ध्यात भाजप पदाधिकाऱ्यांची उघड दहशत! डॉक्टर संकेत रावेकर यांच्यावर रुग्णालयात घुसून हल्ला – कायदा हातात घेऊन गुंडशाहीचा थेट नंगानाच; भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांमुळे आरोग्य यंत्रणा हादरली
आरोपी नावासह थेट बेनकाब - अंकिता होले, सचिन होले, नवाज खा पठाण, राहुल बुले व चार अज्ञात; डॉक्टरांवर हात उगारून सत्ता आणि दबावाचा माज - तात्काळ अटक नाही तर तालुक्यात आरोग्य सेवा ठप्प करण्याचा वैद्यकीय संघटनांचा थेट इशारा
वर्धा : उपचार सुरू असताना एका महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेचे खापर थेट डॉक्टरांच्या डोक्यावर फोडत तळेगाव (श्या.पं) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घुसून वैद्यकीय अधिकाऱ्यावर बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेने संपूर्ण आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली असून डॉक्टर व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चिस्तूर गावातील रहिवासी लता मिसळे (वय ४५) यांची प्रकृती अचानक गंभीर झाल्याने त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्याचे नियोजन होते. याच पार्श्वभूमीवर माजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता होले यांनी तळेगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संकेत रावेकर यांना दूरध्वनी करून रुग्णवाहिकेची मागणी केली.
त्यावेळी उपलब्ध रुग्णवाहिका ही गर्भवती महिलांसाठी राखीव असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र “फक्त रुग्णाला आर्वीपर्यंतच न्यायचे असून तेथून दुसऱ्या रुग्णवाहिकेची व्यवस्था केली जाईल,” असे सांगत वैद्यकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यात आला. अखेर रुग्णवाहिका चिस्तूर गावात पाठवण्यात आली.
त्या रुग्णवाहिकेतून लता मिसळे यांना आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. या मृत्यूनंतर मृतदेह परत चिस्तूर गावाकडे नेत असतानाच संतप्त जमावाने थेट तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले.
“तुमच्या निष्काळजीपणामुळे त्या महिलेचा नाहक बळी गेला, ती आता परत येणार नाही,” असे म्हणत वैद्यकीय अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करण्यात आला. शिवीगाळ, धमकावणे आणि त्यानंतर थेट मारहाण करून रुग्णालय परिसरात दहशत निर्माण करण्यात आली.
या प्रकरणात सचिन होले, अंकिता होले, नवाज खा पठाण, राहुल बुले तसेच आणखी चार अज्ञात व्यक्ती सहभागी असल्याचा गंभीर आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. या सर्वांविरोधात वैद्यकीय अधिकारी डॉ. संकेत रावेकर यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
घटनेच्या तीव्र निषेधार्थ तालुकास्तरीय वैद्यकीय संघटनांनी तळेगाव पोलीस ठाण्यात निवेदन सादर करत आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. डॉक्टरांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे आरोग्य व्यवस्था पूर्णपणे असुरक्षित बनत असल्याचा इशारा देत, दोषींवर कारवाई न झाल्यास तालुक्यातील आरोग्य सेवा ठप्प करण्याचा थेट इशाराही संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती व संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी व नुकसान) प्रतिबंध अधिनियम २०१० अंतर्गत कलम ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आजही भीतीच्या सावटाखाली काम करत आहेत.