खाकी वर्दीतील रक्षक की हरामखोर भडवा? रामनगर पोलिस ठाण्यात शिपाई प्रसाद शिंदेवर गंभीर आरोप; तक्रार देण्यासाठी गेलेल्या युवकाला पोटावर बेदम ठोसे, लिव्हर फाटल्याची शक्यता
वर्धा : जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्या खाकी वर्दीतील पोलिसांच्या वागणुकीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना रामनगर पोलिस ठाण्यात घडल्याचा आरोप समोर आला आहे. तक्रार नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलेल्या एका युवकाला रामनगर पोलिस ठाण्यातील शिपाई प्रसाद शिंदे याने पोटावर बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचे सांगितले जात असून या घटनेमुळे युवकाची प्रकृती गंभीर झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवक काही कारणास्तव तक्रार देण्यासाठी रामनगर पोलिस ठाण्यात गेला होता. मात्र तक्रार ऐकून घेण्याऐवजी त्याच्याशी उर्मटपणे वागत त्याला शिवीगाळ करण्यात आली आणि संतापाच्या भरात पोटावर जोरदार बुक्क्यांचा मारा केल्याचा आरोप केला जात आहे. अचानक झालेल्या या मारहाणीमुळे युवकाला तीव्र वेदना होऊ लागल्या आणि त्याची प्रकृती बिघडली.
मारहाणीनंतर जखमी युवकाला तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर युवकाच्या लिव्हरला गंभीर इजा झाली असून लिव्हर फाटल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला तातडीने सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे
घटनेनंतरही संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने कोणतीही खंत व्यक्त केली नसल्याची चर्चा आहे. उलट “पोलिस अधीक्षकाला आम्ही मोजत नाही, आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही” असे उर्मटपणे बोलत तो ठाण्यातून निघून गेल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. या कथित वक्तव्यामुळे पोलिस दलातील शिस्त आणि जबाबदारीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
पोलिस ठाण्यातच तक्रारदार युवकाला मारहाण होऊन त्याची प्रकृती गंभीर होण्याइतकी घटना घडत असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुठे जावे, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. खाकी वर्दीच्या आडून काही जणांची दादागिरी सुरू आहे का, अशीही चर्चा आता जोर धरू लागली आहे.